गुंदले ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय ! औद्योगिक प्रकल्पांना गावात मज्जाव
पालघर ! पालघर जिल्ह्यातील गुंदले ग्रामपंचायतीने एक ठाम आणि जनहिताचा निर्णय घेत औद्योगिक प्रकल्पांवर गावात बंदी घालण्याचा ग्रामसभा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या जाहीर नोटीसनुसार, गुंदले गाव आणि परिसरातील वाड्यांमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारच्या औद्योगिक बांधकामांना, स्टोरेज यार्डला, आर.एम.सी. प्लांट, क्रेशर प्लांट, डांबर प्लांट आणि तत्सम प्रकल्पांना परवानगी/ना हरकत दाखला दिला जाणार नाही.
हा निर्णय १४ मे २०२५ रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत ठराव क्र. ०९ अंतर्गत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे मूलभूत कारण म्हणजे ग्रामस्थांचा औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणामांवरील तीव्र विरोध.
गावातील नागरिकांनी यापूर्वीही औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली होती. ग्रामपंचायतीकडून दिलेल्या संकेतांनुसार, स्थानिक लोकांचे आरोग्य, पाणीप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि शेतीवरील परिणाम लक्षात घेता ग्रामस्थांनी औद्योगिकीकरणास विरोध दर्शवला.
या निर्णयामुळे गुंदले गावाने स्थानिक स्वराज्य आणि लोकशाही प्रक्रियेचा सकारात्मक उपयोग करून पर्यावरण रक्षण आणि ग्रामहित जपल्याचा आदर्श निर्माण केला आहे.